ब्रेकिंग न्यूज

अति वेगामुळे अनियंत्रित कारची ट्रकला पाठीमागून जोराची धडक; 2 मित्र जागीच ठार

लातूर-अहमदपूर मार्गावर मध्यरात्री अपघात, मृत दोघे होते मित्र

लातूर – भरधाव क्रेटा कारने ट्रकला मागून धडक दिल्याने दोन तरुण जागीच ठार झाले. मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास अहमदपूर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. अपघातग्रस्त कार ट्रकच्या खाली अडकल्याने पत्रा कटरने कापून मृतदेह बाहेर काढण्यासाठी ३ तास लागले. कारचालक रविकुमार तुकाराम दराडे (२०, रा. कराडनगर, अहमदपूर) व त्याचा मित्र सागर ससाने (२०, रा. फतेपूर, अहमदपूर) अशी दोघा मृतांची नावे आहेत. ते अहमदपूर येथील एकाला लातूर रेल्वेस्थानकात सोडून परत येत होते. अति वेगामुळे कार अनियंत्रित झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. अहमदपूर येथील ॲड. केसाळे यांच्या क्रेटा कारवर रविकुमार दराडे चालक होता. रात्री एका प्रवाशाला सोडण्यासाठी तो लातूर रेल्वेस्टेशनवर गेला होता. त्याने मित्र सागर ससाने याला सोबत घेतले. प्रवाशाला लातूरला सोडल्यानंतर दोघेही परत अहमदपूरच्या दिशेने निघाले होते. ताशी १४० किमी वेगात कार सुसाट नागपूर-रत्नागिरी महामार्गावरून जात होती. अहमदपूर शहरात प्रवेश करण्यापूर्वी महामार्गावर ट्रक (एपी ३२ डी ०१९६) नांदेडच्या दिशेने जात होता. या ट्रकवर कार पाठीमागून आदळली. या अपघातात दोघेही जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अहमदपूर पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. मूळगावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. धडकेमुळे ट्रकचे मागील दोन टायर निखळून पुढे निघून गेले होते. अहमदपूर येथून अग्निशमन दलाला बोलावले. कारचा पत्रा कटरने कापून दोन्ही मृतदेह पहाटे ५ वाजता बाहेर काढले. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. अति वेगामुळेच अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांसह अपघातस्थळी धाव घेतली. त्यांनी मदत कार्य करून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी ट्रकचालक मुनीर चुन्नुमीया पाशा यांच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ७९५/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०६ (१), २८१, ३२४ (४) (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रीमंगल यांच्याकडे गुन्ह्याचा पुढील तपास सोपवण्यात आला आहे.

फारुख शेख

मुख्य संपादक Star Tv 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!