आरोग्य

अपघातानंतर चालक आणि कारमधील तिघेजण कार सोडून पळाले

संतप्त नागरिकांनी कार पेटवण्याचा केला प्रयत्न

भरधाव क्रेटा कारने धडक दिल्याने कामावर जाणाऱ्या दोन शेतमजूर महिलांचा मृत्यू झाला. ही घटना नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वर कांद्री माइनजवळ सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने रास्ता रोको आंदोलन करीत महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. मंदा दिलीप उपासे (वय ४९) आणि प्रमिला राजेश शेंद्रे (वय ४१) दोन्ही रा. कांद्री माईन अशी मृतांची नावे आहेत. दोन्ही महिला कापूस वेचण्यासाठी पायी शेतात जात होत्या. तेव्हाच भरधाव क्रेटा कारने त्यांना मागून धडक दिली. धडक एवढी भीषण होती की दोघीही दूरवर फेकल्या जाऊन रस्त्यावर आदळल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडक देणाऱ्या एमएच ०५/ एफजी ४७७६ क्रमांकाच्या क्रेटा कारमध्ये तिघेजण होते. ते उज्जैनला चालले होते. अपघातानंतर तिघेही घाबरले. टोल प्लाझा परिसरात कार उभी करून त्यांनी पळ काढल्याची माहिती आहे. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले. अपघातानंतर रस्त्यावर पडलेले महिलांचे रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह पाहून परिसरात संतापाची लाट उसळली. महामार्गावर जमाव गोळा झाला आणि वाहतूक रोखून धरली. काहींनी कार पेटवण्याचा प्रयत्न केला. परंतु जागरूक नागरिकांनी आग विझवली. सुमारे दीड सात या मार्गावरून वाहतूक बंद होती. यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. घटनेनंतर रस्ता दुभाजक काढून टाकल्यामुळे या मार्गावर अपघात वाढले असून पथदिव्यांची कमतरता आदी प्रश्नांकडे संतप्त आंदोलकांनी लक्ष वेधले. जवळच्या पेट्रोल पंपावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच रामटेकचे उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते, पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कथलाम आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आंदोलकांसोबत चर्चा करून त्यांना शांत केले. पंचनामा करीत दोन्ही मृतदेह रामटेक उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

फारुख शेख

मुख्य संपादक Star Tv 9

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!