एसटी कंडक्टरचा मुजोरपणा! दुचाकी बाजूला घेण्याच्या कारणावरुन पती-पत्नीला मारहाण, शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल

शिर्डीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कंडक्टरने पती-पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. शिर्डी शहरातील आरबीएल चौकात सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. एसटी बसच्या कंडक्टरचा पती-पत्नीला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. दुचाकीस्वाराची दुचाकी बंद पडल्याने रस्त्यावरुन बाजूला घेण्यावरुन एसटी कंडक्टर आणि दुचाकीस्वारामध्ये झाली होती बाचाबाची. यानंतर या बाचाबाचीचे रुपांतर मारहाणीत झाल्याचे पाहायला मिळाले. दुचाकी बाजूला घेतो असे दुचाकीस्वार सांगत असताना एसटी कंडक्टरकडून मारहाण करण्यात आली आहे. सिन्नर येथील दुचाकीस्वार विलास पवार रा. सिन्नर यांच्या फिर्यादीवरून MH 14 MH 0339 या एसटीचे कंडक्टर यांच्यावर शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डीत एसटी कंडक्टरची मुजोरी पाहायला मिळाली. तक्रारीवरून एसटी कंडक्टर यांच्याविरोधात मारहाण व धक्काबुक्कीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित व्हिडिओ तपासात घेतला असून पुढील कारवाई सुरू असल्याचे सांगितले. शिर्डीत घडलेल्या या घटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.



