ट्रेलर आणि टाटा ४०७ मध्ये भीषण धडक, 2 जण गंभीर

अंजनगाव सुर्जी-अकोट महामार्गावरील लखाड ते सातेगाव फाटा दरम्यान दुपारी ३ वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडून आला. टाटा कंपनीच्या ट्रेलर व टाटा ४०७ या वाहनात झालेल्या जोरदार धडकेत दोघे जण गंभीर जखमी झाले असून, ट्रेलरचा चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार, एमएच ४६ बीबी ११२५ क्रमांकाचा टाटा ट्रेलर जलवाहिनीसाठीचे मोठे सिमेंटचे पाईप अंजनगावमार्गे अकोटकडे नेत होता. दरम्यान, अकोटमार्गे अंजनगावकडे कापसाने भरून येणाऱ्या टाटा ४०७ (एमएच ०६ जी ८११४) या दोन वाहनात जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की ४०७ वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला, तर ट्रेलर रस्त्यालगतच्या शेतात उलटला. अपघातात ट्रेलरचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून ४०७ वाहनाचाही मोठ्या प्रमाणात चेंदामेंदा झाला आहे. या घटनेत ट्रेलरमधील हिमांशु इंद्रकुमार मिश्रा वय ३१ वर्ष राहणार रायसिंगपूर अमेठी युपी व ४०७ मधील रवि देविदास कटुकाळे वय ३८ वर्ष राहणार अकोट हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींना तत्काळ अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातानंतर ट्रेलरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली, तसेच अपघातस्थळी जमलेली गर्दी नियंत्रणात आणली. पुढील तपास सुरू असून पसार झालेल्या ट्रेलर चालकाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला होता.



