नुकताच IT कंपनीत नोकरीला, आई-वडिलांना भेटण्यासाठी आला, तिहेरी अपघातात होत्याचं नव्हतं; एकुलत्या एक लेकासह तिघांचा अंत
नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात सकाळी तीन वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात आयटी अभियंता तसेच नाशिक येथील भाजीपाला व्यापाऱ्यासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. येवल्याजवळ झालेल्या दोन विविध अपघातांत तरुणासह महिलेचा मृत्यू झाला. मूळचे केलवड (ता. राहाता) येथील रहिवासी असलेले बाळासाहेब बाजीराव व्यापारी (वय 42, हल्ली रा. महालेफार्म, सिडको, नाशिक) हे सकाळी साडेनऊच्या सुमारास भाजीपाला खरेदीसाठी महिंद्रा पिकअप (एम. एच. 15, जी. व्ही. 7149) घेऊन सिन्नरमार्गे राहात्याकडे निघाले होते. त्यांच्यासोबत नातेवाइक अवधूत रामनाथ निर्मळ (वय 23, रा. पिंप्री निर्मळ, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) हाही गावी जाण्यासाठी सोबत होता. सकाळी सुमारे सव्वादहाच्या सुमारास मोहदरी घाटात सिन्नरकडून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या टाटा कंटेनरचा (एम. एच. 46, ए. आर. 2725) चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर दुभाजक ओलांडून नाशिककडील लेनवर उलटला. त्याचवेळी नाशिककडून सिन्नरकडे येणाऱ्या पिकअप वाहनाला कंटेनरने जोरदार धडक दिली. याच दरम्यान नाशिककडून सिन्नरकडे येणारी दुचाकीदेखील (एम. एच. 15, सी. बी. 6796) कंटेनरच्या तडाख्यात सापडली. अपघातानंतर कंटेनर व पिकअप दोन्ही वाहने उलटली, तर दुचाकीस्वार शाजी फर्नांडो (वय 50, रा. उपनगर, नाशिक) कंटेनरखाली दबले गेले. अपघातात व्यापारी, निर्मळ आणि फर्नांडो यांचा जागीच मृत्यू झाला. याच अपघातापूर्वी मोहदरी घाटात दुसऱ्या वळणावर झालेल्या एका अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. ती दूर करण्यासाठी पोलीस घाटात असतानाच हा अपघात घडला. पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी लागलीच मदतकार्य सुरू केले. गंभीर जखमींना सिन्नर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र, डॉक्टरांनी तिघांनाही मयत घोषित केले. या घटनेमुळे व्यापारी व निर्मळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची खबर न देता कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. निर्मळ पिंप्री (ता. राहाता) येथील रहिवासी अवधूत रामनाथ निर्मळ (वय 23) हा नुकताच मुंबईतील एका खासगी कंपनीत आयटी अभियंता म्हणून रुजू झाला होता. आई-वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता. सुट्टीसाठी तो मुंबईहून नाशिकला आला होता. नातेवाइकांच्या पिकअप वाहनातून गावी जात असताना मोहदरी घाटात त्याच्यावर काळाने घाला घातला. दरम्यान, मोहदरी घाटात वारंवार होणारे अपघात, जड वाहतुकीचा वेग व चुकीच्या दिशेने होणारी वाहतूक यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, या ठिकाणी तातडीने उपाय योजण्याची मागणी होत आहे.



