क्राईम

पोलिस झोपले अन् वनविभाग जागा

वनविभागाची धडाकेबाज कारवाई; लाखांचा गुटखा जप्त

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वनविभागाने केलेल्या धडाकेबाज कारवाईने जळगाव जामोद पोलिस प्रशासनाची अक्षरशः पोलखोल केली आहे. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात अवैधरित्या आणला जाणारा तब्बल ५० ते ७५ लाख रुपये किमतीचा विमल गुटखा व पान मसाला वनविभागाने जप्त केला. विशेष म्हणजे, ही कारवाई थेट पोलिसांच्या नाकावर टिच्चून झाली असून, त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रात्री १ ते २ वाजताच्या सुमारास वनविभागाच्या चेक पोस्टवर संशयावरून थांबविण्यात आलेल्या आयशर ट्रक (क्र. MH30 BD 7585) मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा आढळून आला. वन कर्मचाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत ट्रक जप्त केला व पोलिसांना पाचारण केले. मात्र, यानंतर सुरू झाला संशयास्पद ‘पोलीस खेळ’!जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतून रोजच गुटख्याची खुलेआम वाहतूक होत असतानाही पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष सर्वश्रुत आहे. या प्रकरणातही अधिकृत व्हिडिओ चित्रीकरण टाळण्यात आले, आरोपींना कायदेशीर ताब्यात घेण्याऐवजी त्यांच्याच मदतीने गुटखा खाली करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे पोलीस नेमके कोणासाठी काम करत आहेत? असा थेट सवाल उपस्थित होत आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभालाही यावेळी दुय्यम व अपमानास्पद वागणूक देण्यात आली. वार्ताकनासाठी गेलेल्या पत्रकारांना माहिती देण्यास टाळाटाळ, सहकार्याचा अभाव आणि दबावाची भाषा वापरल्याने संतापाची लाट उसळली आहे. कारवाई पारदर्शक ठेवण्याऐवजी ती दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट दिसते. दरम्यान, गुटखा माफियांचे जाळे पोलिसांच्या आशीर्वादानेच फोफावत असल्याची जोरदार चर्चा नागरिकांत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ लक्ष घालून पोलिस-गुटखा माफिया साखळी उघड करावी व दोषींवर कडक कारवाई करावी, अशी ठाम मागणी आता जोर धरू लागली आहे.

फारुख शेख

मुख्य संपादक Star Tv 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!