बेराळा फाट्याजवळ कारच्या भीषण अपघातात मेहकर येथील डॉक्टर तरुणाचा जागीच मृत्यू एक गंभीर

चिखली जालना मार्गावरील भानखेड फाटा व बेराळा फाटा दरम्यानच्या वळणावर सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात मेहकर येथील सुप्रसिद्ध ऋषीकृपा सोनोग्राफी सेंटरचे डॉक्टर ऋषिकांत उर्फ बंटी रमेश काटे (वय ३८) यांचा जागीच मृत्यू झाला. एक्स यूव्ही–७०० (एमएच २८ बी डब्ल्यू ९३९४) ही कार सुमारे ७० ते ८० फूट शेतात शिरली. धक्क्याने डॉ. काटे शेतात पडले, तर गाडी परत रस्त्यावर आली. प्राप्त माहितीनुसार, डॉ. काटे हे बुलडाण्यावरून मेरा–दरेगाव मार्गे मेहकरकडे जात असताना सायं. ५.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या कारचा ताबा सुटला. वाहन वळणावरून घसरून सरळ शेतात घुसले. अपघात इतका भीषण होता की गाडीचे पूर्ण नुकसान झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. काटे घटनास्थळीच मृत पडले, तर गाडी पुन्हा रस्त्यावर आली. घटनेनंतर नागरिकांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले. गाडीत त्यांच्यासोबत असलेला कंपाउंडर वैभव बद्रीनाथ जाधव याचा सीटबेल्ट स्थानिकांनी वेळेवर कापून त्याला बाहेर काढले. तो किरकोळ जखमी झाला असून पुढील उपचारासाठी हलविण्यात आला आहे. डॉ. काटे यांना तातडीने चिखली येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉ. काटे हे मेहकर येथील ऋषीकृपा सेंटरचे संचालक होते. त्यांची पत्नी राधा काटे या कळमेश्वर येथील सरकारी रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यांना तीन वर्षांची मुलगी आहे. अपघाताची माहिती मिळताच त्यांचे वडील आणि नातेवाईकांनी चिखलीत धाव घेतली. हॉस्पिटलमध्ये काही काळ “डॉक्टर उपचार करत आहेत” अशी माहिती दिली जात होती; मात्र अखेर सत्य समोर आल्यानंतर कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. चिखली–देऊळगाव राजा मार्गावरील भानखेड–बेराळा फाटा दरम्यानचे हे वळण अपघातप्रवण आहे. दर आठ–दहा दिवसांत येथे अपघात होतात आणि अनेकांनी येथे जीव गमावला आहे. तरीसुद्धा बांधकाम विभागाचे या ठिकाणी अक्षम्य दुर्लक्ष दिसून येते. वळण असल्याचे दर्शविणारे ठळक फलक येथे नाहीत. नवीन चौपदरी महामार्ग तयार करताना ही दोन्ही धोकादायक वळणे सरळ करणे आवश्यक होते; परंतु प्रशासनाने तसे केले नाही, अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी आहे. नवीन ड्रायव्हर या मार्गावरून जाताना बहुतेक अपघात याच वळणावर होतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे दोन्ही वळण दुरुस्त करण्यासाठी कधी पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



