
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा इथे सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कापूस वेचणीला पिंपळगावराजा इथं जाणाऱ्या मजूर महिलांच्या वाहनाला बसनं धडक दिली. या मालवाहू पिकअप वाहन क्रमांक एमएच 38 ई 2082 याला जाफराबाद-जालना मार्गावरून भरधाव वेगानं येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बस क्रमांक एमएच 20 बीएल 2276 ने मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन मजूर महिला जागीच ठार झाल्या, तर पाच महिला गंभीर जखमी झाल्या. यात मायाबाई सुरज काजले (वय 45, रा. बुरहानपूर, मध्य प्रदेश) आणि रिचा कासदेकर (वय 32, रा. अमरावती ) यांचा मृत्यू झाला. सुहाना प्रतिराम इपने (वय 16), रा. नांदुरी, ता. धारणी, खुशबू बबलू पालवी (वय 17), रा. तागमला, ता. खगनार, जि. बुरहानपूर, सुलोचना हारासिंग सहारे (वय 35), रा. भगवानपुरा, ता. नांदोरी, जि. धारणी, पुरुषाने मंगल इपने (वय 22), रा. भगवानपुरा, ता. नांदुरी, ता. धारणी, नर्मदा सोनू इपने (वय 45), रा. नांदुरी, ता. धारणी, जि. अमरावती आदी गंभीर जखमी झाले आहेत. या भरधाव बसनं पिकअपला मागून जोरदार धडक दिली. यात दोन महिला ठार झाल्या असून पाच महिला जखमी झाल्या. जखमी महिलांना तत्काळ देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. अपघात इतका भीषण होता की ठार झालेल्या दोन्ही महिलांचं शरीर पूर्णपणे क्षत-विक्षत झालं होतं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ही बस जाफराबादकडून जालनाकडं जात होती. दरम्यान, परराज्यातून आणि अमरावती जिल्ह्यातून हंगामासाठी दाखल झालेल्या महिला मजूर देऊळगाव राजा परिसरातील कापूस वेचणी आणि जिनिंगच्या कामासाठी रोज सकाळी पिकअप वाहनानं जातात. सकाळी असंच वाहन थांबलेलं असताना महिलांना बसवताना हा अपघात घडला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपासात गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांनी दिली. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक डॉ. अक्षय गुठे आणि समाधान आघाव यांनी मदत कार्यात पुढाकार घेतला. देऊळगाव राजा पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेतलं. अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मजूर महिलांच्या सुरक्षित वाहतुकीबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.



