मुलीचा मृतदेह गादीत गुंडाळून आई-वडील गावी निघाले
20 वर्षीय मुलीची आई वडिलांनी का केली हत्या..?

वाळूज – पोलिसांनी अडवताच बिंग फुटलं, छत्रपती संभाजीनगरमधील हादरवणारी घटना. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडगाव कोल्हाटी येथील साबळे कुटुंब गावी जात असताना तिसगाव चौफुली येथे त्यांच्या गादीत संशयास्पदरीत्या काहीतरी गुंडाळले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गादीची तपासणी केली. गादी उघडून पाहिले असता त्यामध्ये 20 वर्षीय नंदणी राजू धिवरे या तरुणीचा मृतदेह आढळून आला. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता संबंधित तरुणीच्या सावत्र आई-वडिलांनी, “मुलीने गळफास घेतला असून तिचा मृतदेह गावाकडे अंत्यसंस्कारासाठी घेऊन जात होतो,” अशी माहिती दिली. मात्र, परिस्थिती संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी मृतदेह तातडीने घाटी रुग्णालयात पाठवून शवविच्छेदनासाठी ठेवला आहे. दरम्यान, पुढील तपासासाठी सावत्र आई-वडिलांना ताब्यात घेण्यात आले असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. आम्हाला घरातील साहित्य गावी न्यायचं आहे म्हणत वडगाव पासून तिसगाव चौफुलीपर्यंत रिक्षा भाड्याने केली. रिक्षा चालकाने ड्रम, कपडे व इतर साहित्याबरोबर एका गादीमध्ये काहीतरी गुंडाळलेलं असल्याच दिसलं. सामान भरताना त्याच्या लक्षात आलं, त्याने त्यांना तिसगाव चौफुली येथे सोडताच 112 ला फोन करून सांगितले की, त्या गाधीमध्ये गुंडाळून ठेवलेले साहित्य आहे, त्यात काही संशयास्पद आहे. पोलिसांनी तिसगाव चौफुली येथे चौकशी केली असता पुढील घटना उघड झाली. त्यावेळी त्यांना काही घरगुती वापराचे सामान आढळले. पण गादी पाहिली असता त्यात कुणीतरी गुंडाळल्याचे त्यांना आढळून आले. त्यात 20 वर्षीय तरुणी गुंडाळलेल्या अवस्थेत आढळली. पोलिसही हा प्रकार पाहून चक्रावून गेले. मुलीचे अफेअर होते. त्यामुळे तिने गळफास घेतला. आम्ही गावी घेऊन निघालो होतो, असे आईचे म्हणणे आहे. हा प्रकार आत्महत्येचा आहे की घातपाताचा याचा तपास आता वाळूज एमआयडीसी पोलीस करत आहेत. पोलिसांनी मुलीच्या वडिलांना आणि सावत्र आईला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी याप्रकरणी संशयास्पद मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर वीस वर्षीय तरुणीच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. पण सध्या तरी या घटनेवरून अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या मृत्यूचे कारण समोर आल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.



