मोठी बातमी! चार्टर्ड प्लेनला भीषण अपघात; 10 किमी अंतर कापताच कोसळलं, 6 जण जखमी

ओडिशाच्या राउरकेलाहून भुवनेश्वरला निघालेल्या ९ सीटर चार्टर्ड विमानाचा अपघात झाला आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास विमानाला अपघात झाला. हे विमान इंडिया वन एअर कंपनीचं होतं. राउरकेलाहून उड्डाण केल्यानंत विमानानं जेमतेम १० किलोमीटर अंतर कापलं. यानंतर विमानाला अपघात झाला. सुदैवानं विमान अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. विमानात पायलटसह एकूण ६ जण होते. त्यांना इजा झालेली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ सीटर विमानाला उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांनी अपघात झाला. या विमानानं अवघं १० किलोमीटर अंतर कापलं होतं. विमानात चार प्रवासी आणि दोन कर्मचारी होते. कॅप्टन नवीन कडंगा आणि कॅप्टन तरुण श्रीवास्तव अशी दोघांची नावं आहे. अपघातात सहाही जण जखमी झाले आहेत. त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली. त्यांना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. विमानातील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन पथकांनी अपघातस्थळी धाव घेतली. पोलीस आणि स्थानिक प्रशासनानं त्यांना सहकार्य केलं. पायलट्सकडून आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न झाला. पण जालदा जवळ विमान अतिशय वेगानं खाली आलं. त्यामुळे आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न फोल ठरला. विमान कोसळताच परिसरात खळबळ उडाली. आपत्कालीन यंत्रणांनी तातडीनं अपघातस्थळ गाठून मदत आणि बचाव कार्य सुरु केलं. दुपारी सव्वाच्या सुमारास विमानानं राउरकेलामध्य उतरणं अपेक्षित होतं. पण त्याआधीच विमानाला अपघात झाला. विमान अपघातामागील कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्याचा शोध घेतला जात आहे. विमान अपघाताची कारणं आणि त्यावेळची परिस्थिती, यांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर अपघाताच्या मागील कारणांचा उलगडा होऊ शकेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि संबंधित यंत्रणा सतर्क आहेत. या अपघातामुळे अंतर्गत विमान उड्डाणांच्या सुरक्षेचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



