यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.एड. परीक्षेत प्रतिमा रामकृष्ण कस्तुरे यांना सुवर्णपदक

फारुख शेख ( 9923234500 )
चिखली – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या सेवांतर्गत बी.एड. (सत्र 2023-25) अभ्यासक्रमाच्या परीक्षेत प्रतिमा रामकृष्ण कस्तुरे यांनी घवघवीत यश मिळवले आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून गुणवत्ता यादीत (Merit List) प्रथम स्थान पटकावत त्यांनी विद्यापीठाचे सुवर्णपदक (Gold Medal) आपल्या नावे केले आहे. प्रतिमा कस्तुरे या शासकीय अध्यापक महाविद्यालय, बुलढाणा येथील प्रशिक्षणार्थी आहेत. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो सेवांतर्गत शिक्षकांमधून त्यांनी हे अव्वल स्थान मिळवले आहे. कौतुकाचा वर्षाव: त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. मुक्त विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात त्यांना हे सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. प्रतिमा रामकृष्ण कस्तुरे सध्या बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा वाडी ब्रम्हपुरी केंद्र किन्होळा येथे सहायक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे त्यांचा मूळ गाव अमडापूर तालुका चिखली जिल्हा बुलढाणा हे आहे. प्रतिमा रामकृष्ण कस्तुरे यांनी सुरुवातीपासूनच अभ्यासात सातत्य ठेवून हे यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सेवांतर्गत बी.एड. करत असताना कामाची जबाबदारी आणि अभ्यास यांचा योग्य मेळ घालत त्यांनी हे यश मिळवले, जे इतर प्रशिक्षणार्थींसाठी प्रेरणादायी ठरले आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक वृंद आणि कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. “प्रतिमा कस्तुरे यांच्या कष्टाचे आणि जिद्दीचे हे फळ असून, आमच्या महाविद्यालयासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे,” अशी भावना महाविद्यालयाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.



