क्राईम

सासूसाठी रचलेला विषप्रयोगाचा कट पतीच्या जीवावर बेतला, पत्नीसह प्रियकर जेरबंद

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथे एक अतिशय खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. घरातील वादातून आणि अनैतिक संबंधांतून सासूचा काटा काढण्यासाठी सुनेने केलेल्या विषप्रयोगात दुर्दैवाने पतीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी स्थानिक समाजाने आक्रमक पाऊले उचलली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उंबरगाव येथील सारिका लोहार या महिलेचे गावातीलच शेखर चंदनशिवे नावाच्या तरुणाशी अनैतिक संबंध होते. या बाबतची माहिती सारिकाच्या सासूला मिळाली होती, ज्यावरून त्यांच्या घरात वारंवार वाद होत असत. सासू आपल्या संबंधांच्या आड येत असल्याचे पाहून सारिकाने तिला संपवण्याचा कट रचला. यासाठी तिचा प्रियकर शेखर याने तिला विषारी औषधाची एक बाटली आणून दिली होती. ठरलेल्या कटानुसार, सारिकाने ते विषारी औषध सासू पिण्यासाठी वापरत असलेल्या पाण्याच्या कळशीत मिसळले. रात्रीच्या वेळी सासू पाणी पिण्यासाठी गेली असता, तिला पाण्याची चव काहीशी कडू लागली. त्यामुळे तिने तो पाण्याचा तांब्या तिथेच जेवण करत असलेल्या आपल्या मुलापाशी, म्हणजेच समाधान लोहार याच्याजवळ ठेवला. समाधानने नकळत ते विषमिश्रित पाणी प्यायले. काही वेळातच त्याला उलट्यांचा त्रास सुरू झाला. प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सासूला मारण्यासाठी रचलेला हा कट पतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी तपास चक्र वेगाने फिरवून मुख्य आरोपी सारिका लोहार आणि तिचा प्रियकर शेखर चंदनशिवे या दोघांना ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने या दोघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या कृत्याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शासन व्हावे या मागणीसाठी लोहार समाजातर्फे पंढरपूर उपविभागीय पोलीस कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

 

फारुख शेख

मुख्य संपादक Star Tv 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!