क्राईम

25 वर्षीय महिला पोलिसाला जाळ्यात ओढलं, लग्नाच्या आमिषाने लॉजवर अत्याचार, आरोपी निघाला दोन मुलांचा बाप

नागपूर – लग्न जुळवणाऱ्या मॅट्रिमोनियल संकेतस्थळांचा गैरवापर करुन, विश्वास संपादन करत प्रेमाचे नाटक आणि लग्नाचे आमिष दाखवून तरुणींना जाळ्यात ओढण्याचे प्रकार वाढत असतानाच नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नागपूरमध्ये कार्यरत असलेल्या 25 वर्षीय महिला पोलीस अंमलदाराची एका विवाहित तरुणाने सुनियोजित पद्धतीने फसवणूक केल्या प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणामुळे सायबर गुन्हे, ऑनलाईन ओळखी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं कायद्याचे रक्षण करणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावरच लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने महिला पोलिसाचे आक्षेपार्ह फोटो काढून तिला ब्लॅकमेल केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेला ३० वर्षीय विकिन सूर्यभान फुलारे याने एका नामांकित विवाह नोंदणी संकेतस्थळावर स्वतःला अविवाहित वकील म्हणून सादर केले. याच खोट्या ओळखीच्या आधारे त्याने महिला पोलिसाशी संपर्क साधला. सुरुवातीला चॅटिंग, त्यानंतर व्हिडीओ कॉल्स अशा माध्यमातून त्याने तिचा विश्वास संपादन केला. आपण लग्न करू इच्छित असल्याचे भासवून आरोपीने तिच्याशी भावनिक नाते निर्माण केले. ओळख दृढ झाल्यानंतर आरोपी नागपूरला आला. 28 नोव्हेंबर रोजी त्याने महिलेला लग्नाची मागणी घालून एका लॉजवर नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या दरम्यान आरोपीने महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ चोरट्या पद्धतीने काढल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर हे फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने महिलेला मानसिक दबावाखाली ठेवले. या भीतीचा गैरफायदा घेत आरोपीने फर्निचर खरेदी, वैयक्तिक अडचणी आणि इतर कारणे सांगत वेळोवेळी महिलेकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले. एकूण 15 लाख 60 हजार रुपये त्याने खंडणीच्या स्वरूपात घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. जेव्हा पीडितेने लग्नाचा आग्रह धरला, तेव्हा आरोपीने किन्नरांकडून जिवे मारण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी दिली. अखेर मानसिक त्रासाला कंटाळून महिला पोलिस कर्मचाऱ्याने लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासात आरोपी आधीच विवाहित असून त्याला दोन मुले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. गंगापूर पोलिसांच्या मदतीने सापळा रचत आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणाने ऑनलाईन ओळखीबाबत सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

फारुख शेख

मुख्य संपादक Star Tv 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!