ब्रेकिंग न्यूज

बुलढाण्यात पती-पत्नीचा मृतदेह कारमध्ये आढळला

तेलंगणाहून लग्नासाठी निघाले, पण वाटेतच घात

नांदुरा – तेलंगणाहून एका लग्न सोहळ्यासाठी आपल्या खासगी कारने जळगावकडे निघालेले दाम्पत्य रहस्यमयरित्या बेपत्ता झाले होते. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गालगतच्या एका विहिरीत त्यांची कार आढळून आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. क्रेनच्या सहाय्याने ही कार विहिरीतून बाहेर काढली असता, त्यामध्ये पती-पत्नी दोघांचेही मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अपघाताची शक्यता असली तरी घातपाताचा संशयही व्यक्त होत आहे. जळगाव जिल्ह्यातील पद्मसिंह दामू पाटील हे तेलंगणा राज्यातील सीतापुरम येथील एका खासगी सिमेंट कंपनीत कार्यरत होते. पद्मसिंह पाटील आणि त्यांच्या पत्नी नम्रता हे त्यांच्या MH 13 BN 8583 या कारने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे एका लग्न सोहळ्यासाठी गुरुवारी निघाले होते. सकाळी निघाल्यानंतर त्यांचे त्यांच्या भाऊ रमेश यांच्याशी बोलणे झाले होते. रात्री १० वाजेपर्यंत ते घरी पोहोचणे अपेक्षित होते. मात्र त्यानंतरही ते घरी पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे रमेश यांनी पद्मसिंह यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा मोबाईल बंद येत होता. त्यानंतर त्यांनी नम्रता यांना फोन केला मात्र त्यांचाही फोन बंद येत होता. अखेर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला तेव्हा बेपत्ता दाम्पत्याचे शेवटचे लोकेशन बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते मलकापूर दरम्यान महामार्गावर असणाऱ्या वडनेर गावालगत आढळले. यानंतर पोलिसांचे पथक तात्काळ शोधासाठी रवाना झाले. पोलिसांनी युद्ध पातळीवर शोधमोहीम राबवत असतानाच, वडनेर भोलजी नजीक राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या एका विहिरीमध्ये पांढऱ्या रंगाची कार आढळून आली. ही कार बेपत्ता झालेल्या पाटील दाम्पत्याचीच असल्याची शक्यता वर्तवण्यात आली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने ही कार विहिरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. कार बाहेर काढल्यानंतर, आतमध्ये पद्मसिंह पाटील आणि नम्रता या दोघांचेही मृतदेह आढळल्याने सर्वांना मोठा धक्का बसला. लग्न सोहळ्यासाठी निघालेले दाम्पत्य अचानक विहिरीत कारसह कसे पडले, याबाबत गूढ कायम आहे. हा केवळ अपघात आहे की यामागे कोणताही घातपात आहे, याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, दाम्पत्याच्या मृत्यूमागचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.

फारुख शेख

मुख्य संपादक Star Tv 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!