घरफोडी करणारी पारध्यांची टोळी गजाआड

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका पोलिसांनी घरफोडी करणारी टोळी गजाआड केली. त्यांच्याकडून १० लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत येवला ग्रामीण, निफाड, वैजापूर पोलीस ठाण्याकडील चोरींची उकल करण्यात यश आले. नाशिक ग्रामीण पोलिसांनी वाढत्या चोऱ्या आणि घरफोड्यांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. जिल्हा हद्दीवर नाकाबंदी, तपासणी मोहीम, सराईत गुन्हेगारांची अचानक तपासणी अशी कामगिरी सुरू आहे. काही महिन्यात येवला तालुका पोलीस ठाणे हद्दीतील अंदरसूल, नगरसूल, सावरगांव, एरंडगाव, वायबोथी, सायगांव, कोळम, गवंडगाव, निमगांव मढ, खिर्डीसाठे, भुलेगांव, उंदिरवाडी, भारम अशा ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये सात लाख, ८९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. सारगांव, कुसुमाडी, मुखेड आणि पिंपळगाव लेप येथील चोऱ्यांमध्ये दोन लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. काही भागात एकाच रात्री चार ते पाच घरफोडया झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. गुन्हेगारांवर वचक बसावा, नागरिकांमधील भीती कमी व्हावी, यासाठी येवला पोलिसांनी तीन अधिकारी आणि १२ अंमलदार असे पथक तयार करुन साध्या वेशात खासगी वाहनांनी गस्त वाढवली. चोरी आणि घरफोड्या करणारे संशयित कोपरगाव येथील असल्याचे समजल्यार तपासी पथकाने सापळा रचत चोरांना ताब्यात घेतले. या प्रकरणातील काही चोरटे फरार आहेत.. त्यांनी १४ घरफोडी आणि चोरींची कबुली दिली. त्यांच्याकडून १० तोळे सोने, दोन दुचाकी आणि चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील शुभम चव्हाण हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *