ब्रेकिंग न्यूज

शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

बुलडाणा ( धाड ) – छत्रपती संभाजीनगरहून मलकापूरकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) शिवशाही बसची आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील तिघा युवकांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये ढालसावंगी (ता. बुलढाणा) येथील अंकुश पाडळे (वय,32) रवी चंदनशे (23) आणि कैलास शिंदे (30) यांचा समावेश आहे. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा पूर्णपणे चुराडा झाला आणि दुचाकी बसच्या खाली अडकली. धडकेचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले आणि मोठी गर्दी जमली. ही घटना धाड ते करडी मार्गावरील पुलाजवळ सायंकाळी सुमारे 4.50 वाजता घडली. मलकापूर आगाराची बस (क्रमांक MH-06 BW-3638) करडी येथे पुलावर आली असताना, बस आणि दुचाकी क्रमांक (MH 28 BZ 7242) समोरासमोर धडक झाली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच धाड पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले आणि पुढील तपास सुरू केला. बसमधील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्दैवी घटनेनं ढालसावंगी गावावर शोककळा पसरली आहे. मृतांच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला असून, गावकरी शोकाकुल आहेत. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात रस्ते अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. भरधाव वाहने, रस्त्यांची खराब स्थिती आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन हे अपघातांचं मुख्य कारण मानलं जातं. या अपघातामुळं पुन्हा एकदा रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियम पालनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. धाड पोलीस अधिक तपास करत असून, लवकरच अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होईल.

फारुख शेख

मुख्य संपादक Star Tv 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!