ब्रेकिंग न्यूज

त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेऊन परतताना अपघात, दगडांनी भरलेला टिपर उलटला, दोन पोरं जागेवर गेले

नाशिक – अध्यात्मिक नगरी असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये दुपारी रक्ताचा सडा पडला. त्र्यंबक राजाचे दर्शन घेऊन आनंदाने घरी परतणाऱ्या दोन तरुण पर्यटकांवर काळाने भीषण घाला घातला. भरधाव वेगात असलेल्या आणि दगडांनी गच्च भरलेला डंपर उलटल्याने दोन दुचाकीस्वार पर्यटकांचा डंपरखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा अंगावर काटा आणणारा CCTV व्हिडिओ आता समोर आला असून, सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून लोकांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. ही हृदयद्रावक घटना त्र्यंबकेश्वर गेस्टहाऊसजवळ दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. डंपर उतारावरून वेगाने येत असताना, समोरून चुकीच्या बाजूने सिलिंडरने भरलेला एक ‘छोटा हत्ती’ टेम्पो आला. या टेम्पोला वाचवण्याच्या नादात डंपर चालकाने अचानक जोरात ब्रेक लावला. मात्र, डंपरमध्ये वजनी दगड असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो थेट दुचाकीवर उलटला. बुलढाणा जिल्ह्यातील शिवम राजेश उबरहांडे (२२, रा. पांगरी उंबरहांडे) आणि भूमिका समाधान खेडेकर (२१, रा. अंत्रीखेडेकर) हे दोघे दुचाकीवरून जात असताना डंपर त्यांच्या अंगावरच कोसळला. डंपरमधील महाकाय दगड थेट या दोघांवर पडल्याने त्यांना हालचालीची संधीही मिळाली नाही आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ऐन विशीत असलेल्या दोन तरुणांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. CCTV मध्ये स्पष्ट दिसते की, जर तो सिलिंडरचा टेम्पो चुकीच्या बाजूने आला नसता, तर डंपर चालकाला ब्रेक दाबण्याची गरज पडली नसती. एकाच्या चुकीमुळे दोन निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. घटनेनंतर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जेसीबीच्या मदतीने उलटलेला टिपर बाजूला केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून, दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताने रस्त्यावरील बेशिस्त वाहतूक आणि डंपरच्या वेगावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेचं या घटनेमुळे भरधाव वेग आणि चुकीच्या बाजूने वाहन चालवण्याचे धोके पुन्हा एकदा समोर आले आहेत.

फारुख शेख

मुख्य संपादक Star Tv 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!