हजरत फखरुद्दीन बाबा यांचा १० वा वार्षिक उर्स श्रद्धा व उत्साहात संपन्न

प्रतिनिधी – शेख इमरान ( चिखली )
चिखली शहरातील पत्थर पोई परिसरात असलेल्या हजरत फखरुद्दीन बाबा यांच्या दर्ग्यावर १० वा वार्षिक (सालाना) उर्स अत्यंत श्रद्धा, सूफी परंपरा आणि बंधुभावाच्या वातावरणात उत्साहात पार पडला. या उर्सनिमित्त मोठ्या संख्येने अकीदतमंदांनी दर्ग्यावर उपस्थित राहून चादर अर्पण केली व जियारत करत आपल्या सुख-समृद्धी आणि मगफिरतीसाठी प्रार्थना केली. उर्सच्या दिवशी सकाळपासूनच दर्ग्यावर भाविकांची सतत वर्दळ होती. दर्ग्यावर चादरपोशी झाल्यानंतर असर नमाजीनंतर हारून शाह यांच्या निवासस्थानी फातेहा ख्वानीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी उलेमा, ज्येष्ठ नागरिक व भाविकांनी देशात अमन-शांती, सामाजिक सलोखा आणि सर्वांच्या कल्याणासाठी सामूहिक दुवा केली. या उर्सनिमित्त लंगरचीही भव्य व्यवस्था करण्यात आली होती. लंगरात शेकडो भाविकांनी तबर्रुक स्वरूपात भोजनाचा लाभ घेतला. लंगरचे आयोजन सेवाभाव, शिस्त व शांततेत पार पडले. हजरत फखरुद्दीन बाबा यांचे प्रेम, मानवता, सेवा आणि बंधुभावाचे विचार आजही समाजाला योग्य दिशा देणारे आहेत. उर्सच्या माध्यमातून बाबा यांचा हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आला. या धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक कमिटी, खिदमतगार तसेच स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. एकूणच, हजरत फखरुद्दीन बाबा यांचा वार्षिक उर्स हा धार्मिक श्रद्धेबरोबरच सामाजिक एकोपा आणि बंधुतेचा संदेश देणारा ठरला..

