200 च्या स्पीडने भरधाव कार थेट रेस्टॉरंटमध्ये घुसली

इंदिरानगर – १०० फूट रस्त्यावर एक भीषण अपघात टळल्याची घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या एका कारने दुभाजकावर उडी मारत थेट एका रेस्टॉरंटच्या भिंतीला धडक दिली. ही संपूर्ण घटना रात्री सुमारे ११.३५ वाजता घडली असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ती कैद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कोडा कंपनीची कार ४२ वर्षीय डेरिक टोनी चालवत होता. तो १८ व्या मेन रोडवरून १०० फूट रस्त्याकडे जात असताना अत्यंत वेगाने वाहन चालवत होता. अपघाताच्या वेळी तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. टोनीला डावीकडील वळण योग्यरीत्या घेता न आल्याने त्याने कार थेट दुभाजकावर चढवली. या वेळी त्याच्या कारने एका दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर ती थेट ‘बार्बेक्यू नेशन’ रेस्टॉरंटच्या आत घुसली. या धडकेत रेस्टॉरंटच्या भिंतीचे मोठे नुकसान झाले. अपघाताच्या वेळी रेस्टॉरंटमध्ये जेवण करून बाहेर आलेला लोकांचा एक गट हॉटेलबाहेर उभा होता. सुमारे १० सेकंदांच्या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये कार भरधाव वेगाने येताना, दुभाजकावरून उडी मारताना, पादचाऱ्यांना थोडक्यात चुकवत रेस्टॉरंटच्या भिंतीला धडकताना स्पष्टपणे दिसत आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. रेस्टॉरंटबाहेर उभा असलेला लोकांचा गट सुदैवाने बचावला, तर दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत झाली आहे. जाबिर अहमद असे त्याचे नाव असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून जीवन भीमा नगर वाहतूक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *