वसतिगृहात मैत्रिणीचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढला, प्रियकराला केला सेंड!
छत्रपती संभाजीनगर – शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका खाजगी वसतिगृहात राहणाऱ्या तरुणीने आपल्याच खोलीत राहणाऱ्या जिवलग मैत्रिणीचा कपडे बदलतानाचा आक्षेपार्ह व्हिडिओ छुप्या पद्धतीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. इतकेच नाही तर हा व्हिडिओ तिने आपल्या प्रियकराला पाठवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थी वर्गात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी तरुणी या दोघीही छत्रपती संभाजीनगरमधील एका नामांकित वसतिगृहात एकाच खोलीत राहात होत्या. दोघींमध्ये चांगली मैत्री होती. पीडित तरुणीचा आपल्या मैत्रिणीवर पूर्ण विश्वास होता. मात्र, या विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपी तरुणीने हा घृणास्पद प्रकार केला. जेव्हा पीडित मुलगी कपडे बदलत होती, तेव्हा आरोपी तरुणीने तिचा मोबाईल लपवून ठेवला आणि व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यानंतर हा व्हिडिओ तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रियकराला पाठवला. हा प्रकार पीडित मुलीच्या लक्षात आल्यानंतर तिने तातडीने याची जाब विचारला असता, उडावाउडावीची उत्तरे देण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने त्वरित वसतिगृह प्रशासनाला याची माहिती दिली आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात आरोपी तरुणी आणि तिच्या प्रियकरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपीच्या मोबाईलमधील डेटा आणि चॅट्स तपासले जात आहेत. तसेच, हा व्हिडिओ आणखी कोणाला पाठवला गेला आहे का, याचाही तपास सायबर पोलिसांच्या मदतीने केला जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षणासाठी राज्यभरातून हजारो विद्यार्थिनी येतात. मात्र, अशा घटनांमुळे वसतिगृहातील मुलींच्या सुरक्षेचा आणि गोपनीयतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.



