उपसरपंचाकडून पत्नीची झोपेत निर्घृण हत्या; स्वतःही केला आत्महत्येचा प्रयत्न
कळवण : नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील साकोरेपाडा येथे एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. येथील उपसरपंचाने घरगुती वादातून आणि दारूच्या नशेत स्वतःच्या पत्नीची हत्या केली. यानंतर आरोपीने स्वतःही विषारी औषध प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. नेमकी घटना काय? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळवण तालुक्यातील साकोरेपाडा येथे ही घटना घडली. आरोपी उपसरपंच जयराम महारू पवार (वय ६५) आणि त्यांची पत्नी जिजाबाई जयराम पवार (वय ६०) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सतत वाद होत होते. जयराम पवार यांना दारूचे व्यसन होते, आणि त्यावरून पती-पत्नीमध्ये खटके उडत असत. ३० जानेवारीच्या पहाटे हा वाद विकोपाला गेला. रात्रीच्या वेळी पती-पत्नीमध्ये पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर पत्नी जिजाबाई झोपी गेल्या असताना, दारूच्या नशेत असलेल्या जयराम पवार याने पहाटेच्या सुमारास धारदार शस्त्राने झोपेतच पत्नीच्या गळ्यावर आणि पोटावर वार करून तिची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर आत्महत्येचा प्रयत्न पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी जयराम पवार याने पिकावर फवारणीसाठी आणलेले कीटकनाशक (विषारी औषध) प्राशन केले. मात्र, औषध प्यायल्यानंतर त्याला उलटी झाली आणि त्याचा जीव वाचला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांची कारवाई घटनेची माहिती मिळताच कळवण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. आरोपी जयराम पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.



