दारूसाठी पैसे न दिल्याने नातवानेच केला आजोबाचा खून; परळीतील धक्कादायक घटना
बीड जिल्ह्यातील परळी शहरात माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. दारू पिण्यासाठी आणि मोबाईलसाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका २७ वर्षीय नातवाने आपल्या ७३ वर्षीय वृद्ध आजोबांची अमानुष मारहाण करून हत्या केली. या घटनेमुळे परळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार, परळी शहरातील मिलिंदनगर भागात ही दुर्दैवी घटना घडली. मृत व्यक्तीचे नाव रामभाऊ विठ्ठल गायकवाड (वय ७३) असे आहे, तर आरोपी नातवाचे नाव शुभम बाळू गायकवाड (वय २७) असे आहे. शुभम हा व्यसनाधीन असून तो वारंवार आपल्या आजोबांकडे दारू आणि इतर खर्चासाठी पैशांची मागणी करत असे. घटनेच्या दिवशी शुभमने आजोबा रामभाऊ यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. रामभाऊ यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. या नकारामुळे संतापलेल्या शुभमने वृद्ध आजोबांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. छातीवर आणि पोटावर जबर मार लागल्याने रामभाऊ गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांची कारवाई सुरुवातीला या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, पोलिसांना घटनेचा संशय आल्याने त्यांनी सखोल तपास केला असता, हा नैसर्गिक मृत्यू नसून खून असल्याचे उघडकीस आले. मृत रामभाऊ यांच्या पत्नी द्रोपदाबाई गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संभाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी शुभम गायकवाड याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.



