क्राईम

ATMला दोरी बांधली, गाडी लावून ATM मशीनच उखडून नेण्याचा प्लॅन फसला

धुळे – शिंदखेडा पोलिस ठाण्याच्या सतर्कतेमुळे तब्बल नऊ लाख ६९ हजार रुपयांची एटीएम चोरी थोपवण्यात यश आले आहे. वाहनाला दोरी व एटीएम यंत्र बांधून ते अक्षरशः उखडून नेण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता; मात्र पोलिसांची वेळेवर कारवाई झाल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने पळ काढावा लागला. पहाटे सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास सिक्योरिटी कॅश मॅनेजमेंट सिस्टम (एसआयएस) कंपनीच्या गुरगाव (हरियाणा) येथील कंट्रोल रूमवरून शिंदखेडा परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या एटीएममध्ये छेडछाडीचा अलर्ट प्राप्त झाला. त्यानंतर तात्काळ ही माहिती शिंदखेडा पोलिस ठाण्यात कळविण्यात आली. शिंदखेडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ठाकरे व आणि त्यांचे गस्तीपथक कर्तव्यावर असताना ही त्यांना माहिती मिळाली. गस्ती पथक अवघ्या काही मिनिटातच वाहनासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांच्या वाहनाची चाहूल लागताच एटीएम उखडण्याचा प्रयत्न करणारे व्यक्ती एटीएम तसेच अन्य साहित्य तिथेच सोडून पसार झाले. चोरट्यांनी या गुन्ह्यासाठी ब्लॅक बोलेरो पिकअप व्हॅनचा वापर केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. दोरीच्या सहाय्याने संपूर्ण एटीएम वाहनाला बांधून ते उखडून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र एटीएममधील नऊ लाख ६९ हजार रुपयांची संपूर्ण रक्कम सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेनंतर पोलिसांतर्फे शिंदखेडा परिसरासह सर्व ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून संपूर्ण विभागात तसेच मध्यप्रदेश व गुजरात पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळावरील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून टोलनाक्यांवरील व इतर मार्गांवरील सीसीटीव्ही तपासणी सुरू आहे. फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल होऊन तांत्रिक पुरावे गोळा करत आहे. वेळेवर मिळालेला अलर्ट, पोलिसांची तत्परता आणि जलद प्रतिसाद यामुळे मोठी चोरी टळल्याने नागरिकांनी शिंदखेडा पोलिसांच्या कार्यवाहीचे कौतुक केले आहे. पोलिसांकडून पुढील तपास वेगाने सुरू असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. दरम्यान, या घटनेमुळे एटीएम सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, ग्रामीण व निमशहरी भागातील एटीएम केंद्रांवर सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. रात्रीच्या वेळी एटीएम परिसरात पुरेशी प्रकाशव्यवस्था, कार्यरत सीसीटीव्ही, तसेच अलर्ट सिस्टीमला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी पोलिस व सुरक्षा कंपन्यांमधील समन्वय अधिक बळकट करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे. संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. परिसरातील इतर एटीएम केंद्रांचीही सुरक्षा तपासणी करण्यात येणार असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी रात्रगस्त, नाकाबंदी आणि तांत्रिक निगराणी अधिक कडक करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेनंतर पोलिसांकडून गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास करण्यात येत असून, एटीएम उखडून नेण्याच्या वाढत्या प्रकारांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. आंतरराज्य टोळ्यांचा सहभाग असल्याची शक्यता लक्षात घेऊन तपासाची दिशा त्या अनुषंगाने वळविण्यात आली आहे. तांत्रिक विश्लेषण, वाहनांच्या हालचालींचा मागोवा आणि संशयितांचे नेटवर्क उघड करण्यासाठी विशेष पथके सक्रिय करण्यात आली असून, लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

फारुख शेख

मुख्य संपादक Star Tv 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!