अचलपूर – अचलपुरातील बंद पडलेल्या रेल्वे स्टेशन परिसरात सुरू असलेल्या अनैतिक देहव्यवसायावर अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. तसेच देहव्यापारासाठी वापरण्यात येणारी मुलगी सुरक्षित ताब्यात घेण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उपविभाग अचलपुरात पेट्रोलिंगदरम्यान बंद पडलेल्या रेल्वे स्टेशन परिसरात कांताबाई प्रविण शाहा ही महिला मुलींमार्फत देहव्यापार चालवित असल्याची खात्री झाली. त्यानुसार पथकाने एक बनावट ग्राहक पाठविला. तेव्हा कांताबाई शाहा हिने बनावट ग्राहकाकडून रोख पैसे घेत त्याच्यासोबत असणाऱ्या देवानंद विजयराव बारखडे या तरुणासोबत जुन्या पडक्या क्वार्टरकडे पाठविले.
बनावट ग्राहकाने ठरल्याप्रमाणे इशारा दिल्यानंतर पथकाने पंचासमक्ष छापा टाकला. त्यात कांताबाई शाहा हिला पैशांसह ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर संबंधित क्वार्टरमध्ये पाहणी केली असता तेथे बनावट ग्राहक देहव्यापारासाठी आणलेल्या मुलीसोबत आढळून आला.
चौकशीत कांताबाई शाहा (५०, रा. पेन्शनपुरा, परतवाडा) हिने देहव्यवसायासाठी मुलगी पुरवल्याची कबुली दिली, तर तिच्यासोबत बनावट ग्राहकाला घेऊन जाणाऱ्या देवानंद विजयराव बारखडे (२५, रा. बालाजी नगर, परतवाडा) यालाही ताब्यात घेण्यात आले. सदर मुलीनेही चौकशीत सांगितले की कांताबाई शाहा आणि देवानंद बारखडे यांनी तिला देहव्यापारासाठी बोलावले होते.
कारवाई दरम्यान दोन्ही आरोपींकडून वेश्याव्यवसायातून मिळालेली रोकड १३,००० रुपये, दोन मोबाईल फोन (किंमत अंदाजे २०,००० रुपये), तसेच वेश्या व्यवसायासाठी वापरात असणारे साहित्य, असा एकूण ₹३३,०३० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अचलपुर पोलीस स्टेशनमध्ये कलम ३, ४, ५, ७ – अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम (PITA) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही मोहीम पोलिस अधीक्षक श्री. विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक श्री. पंकजकुमार कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. किरण वानखडे (स्थानीय गुन्हे शाखा, अमरावती ग्रा.) आणि पोलीस निरीक्षक श्री. गजानन मेहेजे (ठाणेदार अचलपुर) यांच्या नेतृत्वात राबविण्यात आली.
पथकामध्ये सहा. पो.नि. सचिन पवार, पोलीस अंमलदार गजेंद्र ठाकरे, युवराज मानमोठे, रविंद्र व-हाडे, सागर नाठे, शांताराम सोनोने, प्यारेलाल जामुनकर, महिला पोलीस अंमलदार सुचिता इंगळे, तसेच चालक मनोज घवळे यांचा समावेश होता.