भोकरदन – मोबाईल ॲपच्या मदतीने गर्भलिंगनिदान करुन गर्भपात करणारे मोठे रॅकेट जालना स्थानिक गुन्हे शाखा व आरोग्य विभागाने उघडकीस आणले. भोकरदन शहरपासून जवळच गवळीवाडी गावाच्या शिवारात चक्क एका गोठ्यात हा प्रकार सुरु होता. यात दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तपासणीचे साहित्य ,मोबाईल, गर्भपाताच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. भोकरदन शहरापासून जवळच असणाऱ्या गवळीवाडी शिवारामध्ये एका पत्र्याच्या गोठ्यामध्ये हा प्रकार सुरु होता. गेल्या अनेक महिन्यांपासून अवैधपणे गर्भलिंगनिदान सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यावरून सायंकाळी जालना जिल्हा शल्यचिकित्सकांचे पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एकत्रितपणे येथे छापा टाकला. यावेळी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. यावेळी तीन महिला गर्भलिंग निदान करण्यासाठी आलेल्या होत्या. धक्कादायक म्हणजे हे दोन्ही आरोपी डॉक्टर नाहीत किंवा त्यांचे वैद्यकीय शिक्षण झालेले नाही. यातील तरुण सतीश सोनवणे हा बारावी पर्यंत शिकलेला आहे तर दुसरा संशयित केशव गावंडे हा भोकरदन शहरातील तेजस पॅथॉलॉजी लॅबचा मालक आहे. जिल्हा परिषद शाळेजवळच हा प्रकार सुरु होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन खामगळ, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्यासह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. गुप्त माहितीवरुन पोलिसांनीहे रॅकेट उद्ध्वस्त केले. यात आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरोपींकडून गर्भपाताच्या गोळ्या,गर्भलिंग निदान करण्यासाठी लागणारे छोटे पोर्टेबल प्रोब मशीन, मोबाईल अप्लिकेशन, टेस्ट ट्यूब इंजेक्शन आणि मोबाईल हे साहित्य जप्त करण्यात आले आहेत. घटनास्थळावरून या गोठ्याचा मालक समाधान चोरमारे हा फरार आहे.भोकरदन-सिल्लोड रोडवर पासून नांजावाडी आणि त्यापुढे दोन किमी अंतरावर असलेल्या गवळीवाडी शिवारात हा प्रकार सुरु हाेता.