जिल्हा परिषद शाळेतील हेडमास्तरचं फुल्ल टाईट
शाळेत प्रार्थना सुरू अन् इकडे मुख्यध्यापकाचा दारू पिऊन धिंगाणा

मेहकर ( मोहना बुद्रुक ) – बुलढाणा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यकाचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा जिल्ह्यातील एका शाळेत अनुभवायला मिळाला. प्रार्थना सुरू असतानाच मुख्याध्यापक विद्यार्थ्यांसमोर दारू पिऊन आले होेते. मेहकर तालुक्यातील मोहना बुद्रुकच्या जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडलाय.
यासंदर्भात प्रत्यक्षदर्शींनी दिलेला माहिती अशी, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील मोहना बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत, शाळेचे मुख्याध्यापक धम्मसागर कांबळे हे दारूच्या नशेत धुंद होऊन आले होते. शाळेच्या आवारात प्रार्थनेदरम्यानच विद्यार्थ्यांसमोर ते धिंगाणा घालताना दिसले. ही घटना सकाळी घडली आहे, जेव्हा शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक हजर होते आणि दैनंदिन प्रार्थना सुरू होती.
पालक आणि ग्रामस्थांनी सांगितले की, मुख्याध्यापक कांबळे हे सकाळीच दारू पिऊन शाळेत आले आणि असभ्य भाषेत शिवीगाळ करू लागले. त्यांनी शिक्षकांनाही धमकावले आणि शाळेच्या आवारात बेशुद्ध पडले. यावेळी घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी प्रार्थना अर्धवट सोडून पळ काढला. काही पालकांनी हा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला आणि तो व्हिडिओ काही तासातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओ पाहून संतापलेल्या ग्रामस्थांनी तत्काळ शाळेसमोर एकजूट दाखवली आणि मुख्याध्यापकांवर त्वरित निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली.
मद्यधुंद अवस्थेत शाळेत गोंधळ घालणाऱ्या आणि शाळेतच दारू पिणाऱ्या मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. संबंधित मुख्याध्यापकाला निलंबित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मेहकर तालुक्याच्या मोहना बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या धम्मसागर कांबळे यांचा शाळेत दारू पितानाचा आणि गोंधळ घालण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर प्रशासनानं दखल घेऊन कारवाईचा बडगा उगारला आहे.



