लग्नाला उरला होता अवघा महिना, त्याआधीच प्रेमी युगुलाने संपवलं जीवन
हॉटेलच्या खोलीत आढळले मृतदेह
कोटपूतली-बहरोड़ (राजस्थान): राजस्थानमधील कोटपूतली-बहरोड़ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका हॉटेलच्या खोलीत २० वर्षीय तरुण आणि १९ वर्षीय तरुणीचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, मृत तरुणीचे पुढील महिन्यात दुसऱ्याच मुलासोबत लग्न ठरले होते, अशी माहिती समोर आली आहे. नेमकी घटना काय? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दिल्ली-जयपूर राष्ट्रीय महामार्गावरील (NH-48) गणगौर मिडवे हॉटेलमध्ये (Gangaur Midway Hotel) घडली. मृतांची ओळख इंद्रा मीणा (२०) आणि मंजू ढांका (१९) अशी पटली असून, दोघेही नारायणपूर परिसरातील अजबपुरा गावचे रहिवासी होते. हॉटेल कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी २२ जानेवारी रोजी हॉटेलमध्ये चेक-इन केले होते. शनिवारी सकाळी इंद्राचा मित्र नवीन मेहता त्याला भेटण्यासाठी हॉटेलवर आला होता. त्याने खोलीचा दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने त्याने हॉटेल व्यवस्थापनाला आणि त्यानंतर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांचा तपास आणि कारण घटनेची माहिती मिळताच बहरोड़ कोतवाली पोलीस आणि एफएसएल (FSL) टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी खोली उघडली असता, दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हे प्रेमप्रकरण असावे असा संशय आहे. तरुणीचे लग्न पुढील महिन्यात निश्चित झाले होते. कदाचित याच कारणातून या प्रेमी युगुलाने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून मृतदेहांचे शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जातील.



