शेतीच्या वादातून सासऱ्याने सुनेला काठीने बेदम बदडले

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील ममदापूर येथे माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती आणि शेतीच्या वादातून एका सासऱ्याने आपल्याच सुनेला लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. येवला तालुक्यातील ममदापूर गावात राहणारे संशयित आरोपी सासरा बबन गुडघे आणि त्यांची सून मनीषा गुडघे यांच्यात शेती आणि पाण्याच्या कारणावरून वाद सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेल्या असता सासऱ्याने त्यांना मज्जाव केला. यावरून दोघात शाब्दिक चकमक उडाली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात सासरा बबन गुडघे यांनी हातातील लाकडी काठीने सुनेला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. व्हिडिओ व्हायरल आणि पोलीस कारवाई या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, त्यात सासरा सुनेवर क्रूरपणे हल्ला करताना दिसत आहे. पीडित महिलेच्या पतीने आणि सासूने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने कोणाचेही ऐकले नाही. या घटनेनंतर पीडित मनीषा गुडघे यांनी येवला तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी सासरा बबन गुडघे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *