विवाहित मुलगी मित्रासोबत गेल्याने आईने संपवल जीवन

छत्रपती संभाजीनगर – विवाहित मुलगी मित्रांसोबत निघून गेली. पोलिसांत तक्रार देऊनही सहकार्य मिळाले नाही. यामुळे मुलीच्या आईने गळफास घेतला. ही घटना सायंकाळी उस्मानपुरा परिसरात घडली. यानंतर संतप्त नातेवाईक मृतदेह घेऊन उस्मानपुरा पोलिस ठाण्यात आले. मोठ्या प्रमाणावर जमाव जमल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मृत महिलेच्या २१ वर्षीय मुलीचा विवाह झालेला आहे. त्यानंतर ती ८ नोव्हेंबरला तिच्या परिचयातील मित्रासोबत घरातून निघून गेली. याबाबत तिच्या पतीने उस्मानपुरा ठाण्यात बेपत्त झाल्याची नोंद केली.या घडामोडींदरम्यान बेपत्ता मुलगी आणि तिचा मित्र बुलडाणा ग्रामीण पोलिसांत हजर झाले. त्यांनी परत आई, वडील आणि पतीकडे येण्यास नकार दिला. याबाबत उस्मानपुरा पोलिसांना माहिती मिळताच मुलीच्या नातेवाइकांना कल्पना देण्यात आली. त्यांनी मात्र तिची भेट घेण्याचा हट्ट कायम ठेवला होता. दोघेही सज्ञान असल्याने गुन्हा दाखल करता येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्यामुळे व्यथित झालेल्या महिलेने घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या युवकाविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली. यानंतर जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची मध्यस्थी, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर मृतदेह घेऊन नातेवाईक माघारी परतले. दरम्यान, पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर, पोलिस निरीक्षक संग्राम ताटे, संभाजी पवार, गजानन कल्याणकर, कृष्णा शिंदे, सचिन कुंभार, अविनाश आघाव यांच्यासह गुन्हे शाखेची पथके व दंगा नियंत्रण पथक ठाण्यात दाखल झाले.प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तरुणीच्या मित्रासह कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *