हळदी-कुंकवासाठी जाणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींचा अपघातात मृत्यू

 नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावर एका मन हेलावणाऱ्या अपघातात दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नाग नदीच्या पुलावर एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही बहिणींचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे यातील एका बहिणीचे नुकतेच लग्न झाले होते, तर दुसरीचे लग्न अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपले होते. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला जाताना काळाचा आघात मिळालेल्या माहितीनुसार, अलिशा मेहर आणि मोनाली घाटोळे अशी मृत बहिणींची नावे आहेत. मकर संक्रांतीनिमित्त आयोजित हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी या दोघी बहिणी दुचाकीवरून (मोपेड) जात होत्या. नागपूर-भंडारा महामार्गावरील नाग नदीच्या पुलावरून जात असताना मागून येणाऱ्या एका भरधाव वाहनाने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दोघींचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. एकीचा संसार अर्ध्यावर, दुसरीच्या लग्नाआधीच अंत या घटनेमुळे परिसरात आणि कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अलिशा मेहर हिचा विवाह अवघ्या ७ महिन्यांपूर्वी झाला होता. तिचा सुखाचा संसार सुरू असतानाच काळाने तिला हिरावून नेले. तर तिची बहीण मोनाली घाटोळे हिचे लग्न ठरले असून, येत्या २६ फेब्रुवारीला तिचा विवाह होणार होता. घरात लग्नाची लगबग सुरू असतानाच हा आघात झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्या घरात सनई-चौघडे वाजनार होते, तिथे आता शोककळा पसरली आहे. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी अपघातानंतर नागपूर-भंडारा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अज्ञात वाहन चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *