ब्रेकिंग न्यूज

विद्यार्थ्यांच्या सहलीची बस पुलावरुन खाली उलटली

50 विद्यार्थी, चालक, शिक्षक व आचारी मिळून 57 जण जखमी

पुणे – कराडजवळ पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणारी बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चालकासह ५० विद्यार्थी, दोन शिक्षक आणि चार आचारी असे एकूण ५७ जण जखमी झाले असून त्यापैकी एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक आहे. घटना पहाटे साडेपाचच्या सुमारास वाठार (ता. कराड) हद्दीत घडली. पुणे-बंगळुरू महामार्गाचे रुंदीकरण आणि उड्डाणपुलांचे काम सुरू असल्याने सातारा-कराडदरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यांवर वळणे, बॅरिकेड्स आणि रस्त्याच्या कडेला खुदाईचे काम सुरू आहे. सुरक्षा उपाययोजना अपुऱ्या असल्याने या मार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे. उपलब्ध माहितीनुसार, नाशिक येथील पी. बी. पाटील महाविद्यालयाची सहलीची बस (MH 04 JP 0920) मालवण येथे जाऊन नाशिककडे परतत होती. वाठारजवळ उड्डाणपुलाचे काम सुरू असताना योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस थेट खोल खड्ड्यात कोसळली. धडकेची तीव्रता इतकी होती की बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर जागोजागी एकच गोंधळ उडाला. वाठार येथील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच कराडचे पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने कृष्णा रुग्णालयात हलवण्यात आले. यापैकी सुमारे ४० विद्यार्थ्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून उर्वरित विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. दरम्यान, आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कृष्णा रुग्णालयात भेट देऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. उपचारांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी डॉक्टरांना दिले.

फारुख शेख

मुख्य संपादक Star Tv 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!