मालाड रेल्वे स्थानकावर प्राध्यापकाची हत्या; आरोपी ओंकार शिंदेला वसईतून अटक

मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकावर शनिवारी संध्याकाळी एका धक्कादायक घटनेत ३३ वर्षीय प्राध्यापकाची भोसकून हत्या करण्यात आली. लोकलमधून उतरताना झालेल्या किरकोळ वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी बोरीवली जीआरपी आणि मुंबई पोलिसांनी वेगाने तपास करत १२ तासांच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. नेमकी घटना काय? मृत्यू झालेल्या प्राध्यापकाचे नाव आलोक कुमार सिंह (३३) असे असून ते विलेपार्ले येथील प्रतिष्ठित नरसी मोनजी (NM) कॉलेजमध्ये गणित आणि सांख्यिकी विषयाचे प्राध्यापक होते. शनिवारी संध्याकाळी ५.४० च्या सुमारास ते विलेपार्लेहून कांदिवलीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलने प्रवास करत होते. मालाड स्थानक येताच ट्रेनमधून उतरताना आरोपी आणि प्राध्यापक यांच्यात धक्का लागल्यावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपीने रागाच्या भरात आलोक सिंह यांच्या पोटात धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आलोक सिंह यांना उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आरोपी सीसीटीव्हीमुळे जाळ्यात हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले होते. रेल्वे पोलिसांनी स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक व्यक्ती संशयास्पदरित्या पळताना दिसली. या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. ओंकार एकनाथ शिंदे (२७) असे आरोपीचे नाव असून, तो व्यवसायाने मजुरी काम करतो. पोलिसांनी त्याला वसई येथून ताब्यात घेतले. शांत स्वभावाचा बळी आलोक सिंह हे मूळचे उत्तर प्रदेशातील असून, ते मालाड पूर्व येथे आपल्या पत्नीसह राहत होते. अवघ्या दोन वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. त्यांचे वडील केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे. आलोक सिंह हे अतिशय शांत आणि संयमी स्वभावाचे होते, असे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. एका क्षुल्लक कारणावरून त्यांचा नाहक बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.



