एकतर्फी प्रेमातून ३८ वर्षीय विवाहित शेजाऱ्याने केली २३ वर्षीय तरुणीची हत्या; आत्महत्येचा बनाव उघड

नागपूरमधील मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील गोधनी भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ३८ वर्षीय विवाहित पुरुषाने आपल्या शेजारी राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीची एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या केली. हत्येनंतर आरोपीने हा प्रकार आत्महत्या वाटावा यासाठी तरुणीचा मृतदेह पंख्याला लटकवला होता. मात्र, शवविच्छेदन अहवालातून या क्रूर कृत्याचे सत्य बाहेर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव प्राची खापेकर (२३) असून ती गोधनी येथील कलेक्टर कॉलनी, राजलक्ष्मी सोसायटीमध्ये राहत होती. आरोपी शेखर ढोरे (३८) हा तिचा शेजारी असून तो विवाहित आहे. प्राची ही आरोपी शेखरच्या पत्नीसोबत शिवणकामाचे काम करत असे. या ओळखीतून शेखरने प्राचीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेखरचा उद्देश लक्षात येताच प्राचीने त्याला स्पष्ट नकार दिला आणि त्याच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली. मंगळवारी (२० जानेवारी) सकाळी प्राचीचे आई-वडील बँकेत गेले असल्याने ती घरी एकटीच होती. ही संधी साधत आरोपी शेखर तिच्या घरात घुसला. तिथे त्याने पुन्हा तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, ज्याला प्राचीने विरोध केला. यातून दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात शेखरने प्राचीचा गळा दाबून खून केला. आत्महत्येचा बनाव प्राचीचा मृत्यू झाल्याचे समजताच शेखरने स्वतःला वाचवण्यासाठी हा प्रकार आत्महत्या असल्याचे भासवण्याचा कट रचला. त्याने प्राचीचा मृतदेह ओढणीच्या सहाय्याने घरातील सिलिंग फॅनला लटकवला आणि तिथून पसार झाला. प्राचीच्या कुटुंबीयांनी तिला लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर पोलिसांना खबर दिली. पोलिसांचा तपास आणि अटक सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालात प्राचीच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून तिचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर मानकापूर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. संशयावरून पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या शेखर ढोरेला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *